१.
पिंकी बस स्टॉपवर उभी असते. तिला पाहून एक रोड-रोमिओ गाण म्हणू लागतो.
-
तुझमे रब दिखता है यारा मैं क्या करूँ?
पिंकी पण हजरजवाबी असते, लगेच उत्तरते – दक्षिणा ठेव, पाया पड, आणि निघ पुढे.
२.
एकदा रामचंद्र काकांना रमाकाकूंनी त्यांच्या मित्रांसमोर प्रश्न विचारला, ‘आपल्या दोघांमध्ये हुशार कोण आणि मूर्ख कोण ते सांगा?’
काकांनी थोडा विचार करून उत्तर दिले, ‘सर्वांनाच माहित आहे की तू खूप हुशार आणि बुद्धिमान आहे, आणि म्हणूनच तू कधीही एखाद्या मूर्ख माणसासोबत लग्न करणारच नाही.’
आता रामचंद्र काका ‘गोड बोला आणि बायकोला खुश ठेवा’ समितीची अध्यक्ष आहेत.
३.
टपल्या, झपल्या आणि बबल्या यांनी एका ठिकाणी चोरी केली आणि पळून जात होते. पोलिस त्यांच्या मागावर आहेत हे पाहून तिघेही गोदामाबाहेर पडलेल्या गोणीमध्ये लपले. पोलीस पाठलाग करता-करता गोदामापर्यंत येऊन पोहचले. त्यांनी पहिल्या गोणीला लाथ मारली. आतून टपल्याने आवाज दिला “भू—भू”
पोलीस – यात कुत्रं बांधून ठेवलंय बहुतेक.
दुसऱ्या गोणीला लाथ मारली तेव्हा झपल्याने मांजरीचा आवाज काढला “म्यांऊ – म्यांऊ”
पोलीस – यात मांजर ठेवलंय कदाचित.
पोलिसांनी तिसऱ्या गोणीला लाथ मारली. आतून काहीच आवाज आला नाही, म्हणून अजून एक लाथ मारली....परत एक लाथ मारली. शेवटी न राहवून बबल्या बोलला – “आत कांदे आहेत, कांदे”
४.
दयानंद बाबांचं कीर्तन चालू होतं, बरीच गर्दी जमली होती. गर्दीत कोण कुठे बसलंय कळतही नव्हतं पण तरीही सर्वजण तल्लीन होऊन कीर्तन ऐकत होते. एवढ्यात माईकवर एक सूचना देण्यात बंडोपंत देशमुख यांनी त्वरित आपल्या घरी जावे तुमच्या घरची मंडळी तुमची वाट पाहत आहेत. सूचना ऐकून बंड्या त्वरित उठला आणि लगबगीने घरी जायला निघणार एवढ्यात बायकांच्या गर्दीतून त्याच्या बायकोचा आवाज आला – “ए बंड्या, बस खाली. तू इथेच आहेस का आणखी कुठे गेलास हे बघण्यासाठी मीच अनाऊंसमेंट करायला लावली होती.”
५.
एकदा एका झिरो फिगरवाल्या मुलीच्या अंगात भूत शिरलं. पूजा केल्या, गंडे-दोरे बांधले, काही केल्या बाहेर निघेना. सर्व मांत्रिकांनी हात टेकले. पण एक महिन्यानंतर ते भूत एका मांत्रिकाकडे गेले आणि याचना करू लागले –
-
महाराज काहीही करा पण ह्या मुलीच्या शरीरातून बाहेर काढा. गेले एक महिना फक्त अर्धपोटी झोपतो आहे. हिच्या झिरो फिगरपायी उपाशी मारायची वेळ आली आहे. काहीही करा पण ह्या शरीरातून बाहेर काढा.
६.
कस्टमर – काय ओ, तुम्ही हे डासांचे औषध खूप चांगले आहे म्हणून काल मला विकलेत. पण औषध मारून सुद्धा रात्रभर डास त्रास देतात.
दुकानदार - जे डास मेले त्यांचे भाऊबंद बहुतेक बदला घेत असतील.
७.
एके दिवशी एक बाई इच्छापूर्ती गणपतीकडे साकडं घालत होती –
‘हे देवा, प्लीज मला एक जिनी दे, जो मला पैसे देईल, मला सुंदर बनवेल आणि माझी कामंपण करेल. गेले कित्येक दिवस मी तुझ्याकडे हे मागणं मागते आहे आणि तू सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस मग माझी का नाही करत?’
गणपती साक्षात प्रकट होऊन बोलले-
‘मी तुला आधीच एक टॉप मॉडेलचा जिनी दिलेला आहे, दुसरा नाही देऊ शकत.’
‘काय मला जिनी दिला आहे? कधी दिला?’
‘तुझं लग्न झालं त्यादिवशी. तेव्हापासून तो दर महिन्याला तुला पैसे देतो, तु सुंदर दिसण्यासाठी ब्युटीपार्लरमध्ये जातेस तो खर्च भागवण्यासाठी तो ओवरटाईम करतो. आणि तू डोकं दुखतंय, बर वाटत नाहीये, कंटाळा आलाय म्हणून काम नाही करत तेव्हा तुझी सर्व कामे तोच करतो. आणि तो नॉर्मल जिनीसारख्या तीनच इच्छा पूर्ण न करता आयुष्यभर तुझ्या इच्छा पूर्ण करत राहील.’
८.
राणी खूप आजारी असते म्हणून बंड्या तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर तिला तपासून काही औषध आणि चघळण्यासाठी अॅसिडीटीची गोळी देतात. दुसऱ्यादिवशी बंड्या पुन्हा डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये जातो
डॉक्टर – काय बंडोपंत कशी आहे तुमच्या बायकोची तब्येत? बर वाटलं ना तिला?
बंड्या – हो साहेब खूप फरक पडला आहे. धन्यवाद.....फक्त एक विचारायचं होतं.....
डॉक्टर – ठीक आहे, विचारा.
बंड्या (भावूक होऊन)– ती चघळायची गोळी दररोज देऊ शकतो का?
९.
बंड्या थकून-भागून घरी येतो, एवढ्यात ज्युनियर बंड्या म्हणजेच बंड्याचा सुपुत्र मक्या प्रगतीपुस्तक घेऊन बंड्या कडे देतो.
इतिहास-२०, भूगोल-३०, विज्ञान – १५, गणित - २५...... मार्क्स बघून बंड्या भडकतो.
बंड्या – गाढवा, हे काय आहे? हे काय मार्क्स आहेत?
बायको (मध्ये पडत) – अहो.....
बंड्या – तू थांब गं आधी मी ह्याच्याशी बोलून घेतो. काय रे नालायका, मी एवढी दिवसभर मेहनत करून तुला चांगल्या शाळेत पाठवतो, क्लासला पाठवतो तरी तुला एवढे कमी मार्क?
बायको – अहो, ऐका तरी मी काय...
बंड्या – तू गप्प बस. मक्या, अरे मी शाळेत असताना कधीही पहिला नंबर सोडला नाही आणि आज जर लोकांना तुझे मार्क समजले तर काय म्हणतील? एवढ्या हुशार बापाचा मुलगा असा ‘ढ’ निघाला.
बायको – अहो......
बंड्या (बायकोला) – तुला सांगितलं ना, गप्प बस म्हणून. हे सगळे तुझ्या लाडाचे परिणाम आहेत, तूच डोक्यावर चढवून ठेवलायस त्याला. माझी हुशारी घेण्याऐवजी तुझा ‘ढ’पणा घेतलाय त्याने......
बायको – ते त्याचं नाही तुमचं प्रगतीपुस्तक आहे, जुन्या फाईली साफ करताना सापडलंय.
१०.
एका नवीनच चालू झालेल्या दुकानाबाहेर पाटी लावली होती –
‘दुकानात काम करण्यासाठी काऊंटर स्टाफ आणि मदतनीस पाहिजेत. शिक्षणाची किंवा वयाची कोणतीही अट नाही. फक्त येताना डायबेटीसचा रिपोर्ट घेऊन येणे.’
११.
बंड्या – कॉलेजमध्यला प्रोफेसर्सच लेक्चर आणि बायकोचं लेक्चर एक सारखंच असतं.
गण्या – कसं काय बुवा?
बंड्या – दोघांचं लेक्चर इच्छा नसलीतरी मुकाट्याने ऐकावं लागतं आणि ऐकून समजल्यासारखं दाखवावं लागतं.
१२.
पुण्यातील टिळक रोडवरील रेड सिग्नलला सर्वांनी गाड्या थांबवल्या. सिग्नल हिरवा झाला तरीही एका बाईची गाडी चालू होईना. थोड्यावेळाने सिग्नल पिवळा झाला पुन्हा लाल झाला तरीही गाडी तिथेच. ट्राफिक हवालदाराने गाडीत डोकावून त्या बाईला विचारले –
काय झालं मॅडम? कुठलाच रंग आवडला नाही का?
१३.
दुचाकी वाहन चालवणाऱ्या सर्वांना हेल्मेट सक्तीच आहे ही बातमी पेपरात छापून आली आणि जोशीकाका लगबगीने स्कुटी विकायला निघाले. वाटेत कुलकर्णीकाका भेटले.
कुलकर्णी काका – काय रे जोश्या? कुठे चालला आहेस एवढ्या घाईघाईने?
जोशी काका- अरे, तू आजचा पेपर वाचलास का? हेल्मेट घालणं सक्तीचं केलं आहे. मी विचार करतोय की स्कुटी विकून सेकंडहँड कारच घ्यावी. स्वस्त पडेल.
कुलकर्णी काका – काय वेडा झालायस का तू? कार स्वस्त आहे का हेल्मेट?
जोशी काका – अरे, तुला समझत नाहीये. मी आज सकाळीच ही बातमी माझ्या बायकोला आणि मुलीला दाखवायला जात होतो तेव्हा त्या आपआपले कपाट उघडून बसल्या होत्या आणि बोलत होत्या ‘आता एवढ्या सगळ्या साड्या आणि ड्रेसप्रमाणे मॅचिंग हेल्मेट घ्यायला लागेल.’
कुलकर्णी काकांच्या डोळ्यासमोर त्यांच्या तीन मुली आणि बायको आली.
कुलकर्णी काका – तू माझ्यासाठी थांबतो का? मी पण माझी स्कुटी घेऊन येतो.
१४.
जज (आरोपीला) – तुला मी पहिले कुठे तरी पहिल्यासारखं वाटतंय. तुझ्यावर पहिले कधी खटला भरला होता का?
आरोपी – काही पण जजसाहेब, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत, विसरलात का तुम्ही?
१५.
मक्याचे वडील – काय रे गाढवा, बारावीच्या परीक्षेत दुसऱ्यांदा नापास झाला आहेस आणि पेढे काय वाटत सुटलायस?
मक्या – ओ पप्पा, मी नापास झालो म्हणून काय झालं, तुमची होणारी सून फर्स्ट क्लास मध्ये पास झालीय.
१६.
बंड्या – काय रे गण्या? किती लागलंय तुला, काय अॅक्सीडंट झालं की काय?
गण्या – नाही रे, काल मला पाच जणांनी मिळून चोपला.
बंड्या – अच्छा? पण तू काहीचं नाही केलं?
गण्या – अरे छट, मी पण काही कमी नाही. मी बोललो त्यांना पाच जण मिळून काय मारताय, दम असेल तर एक-एकट्याने मारून दाखवा.
बंड्या – मग?
गण्या – मग काय, त्यांनी एका-एकाने पुन्हा धुतला मला.
१७.
एका दारूच्या पिंपात एक उंदीर पडला त्याला कितीही प्रयत्न केले तरी बाहेर निघता येत नव्हते, म्हणून त्याने हाका मारायला सुरवात केली. तिथून जाणाऱ्या एका मांजरीने आत डोकावून पहिले.
उंदीर – अगं मावशे, मला प्लीज बाहेर काढ.
मांजर – त्यात माझा काय फायदा?
उंदीर – पाहिजे तर बाहेर काढल्यानंतर मला खाऊन टाक. मी वचन देतो की मी पळणार नाही.
मांजर खूप प्रयत्न करून पिंप आडवे करते आणि उंदीर पिंपातून बाहेर येतो आणि लगेच बिळात जाऊन लपतो.
मांजर – अरे हरामखोरा, तू तर पळणार नाही म्हणून वचन दिले होतेस ना?
उंदीर – ते तर मी दारूच्या नशेत बडबडत होतो.
१८.
काकू – अरे बेटा, आपका नोट गिर गया.
पक्या (अमिताभ बच्चनच्या आवाजात) – मैं आज भी गिरे हुए पैसे नहीं उठाता..
काकू – अरे गाढवा, तुझा गॅलेक्सी नोट पडलाय.
पक्या – काय? कुठे..कुठे?
१९.
बंड्या – बाहेर पाऊस पडतोय.
राणी – भज्यांचं नाव सुद्धा काढू नका. बेसन संपलय आणि मी पावसात बाहेर जाणार नाही बेसन आणायला. तसेपण कांदे खूप महाग झाले आहेत.
बंड्या – अगं पण....
राणी – आणि प्लीज चहा मागू नका, कामवाली बाई आली नाही म्हणून सकाळची चहाची भांडी धुतलेली नाहीयेत अजून.
बंड्या – पण...
राणी – आणि ग्लास आणि बर्फ तर बिलकुल मागू नका, मक्या मोठा झालाय. त्याला सगळ कळत आता, उगाच वाईट संस्कार न....
बंड्या – पण मी तर तुला बाहेर वाळत घातलेल्या कपड्यांची आठवण करून देणार होतो.
२०.
पक्या (गर्लफ्रेंडला फोनवरून) – हॅलो
गर्लफ्रेंड (स्टाईलमध्ये) – हॅलो, अरे मी ना मम्मी-पप्पांसोबत हॉटेलमध्ये डिनर करतेय, मी तुला नंतर फोन करते.
पक्या – अच्छा? बाय द वे....ज्या भंडाऱ्यात तू जेवते आहेस ना तिथे माझे मित्र जेवण वाढायला आहेत....त्यांना सांगितलंय तुला जे पाहिजे ते आधी वाढायला.....बिनधास्त मागून घे.....ठीक आहे.
२१.
गण्याला भरपूर ताप आला होता. त्याच्या आईने डोक्याला हात लावून पहिले आणि विचारले – ‘बाळा, तुला चिकन सूप देऊ का?’
गण्या – नको
थोड्या वेळाने
आई – ‘ तुला बर वाटतंय का? का चिकन सूप बनवू?’
गण्या – ‘नकोय मला’
पुन्हा थोड्यावेळाने
आई – ‘अरे थोड तरी खावून घे, नाहीतर चिकन सूप आणते.’
खिडकीवर बसलेला कोंबडा न राहवून बोलला – ‘मावशी त्याला नकोय तर कशाला उगाच जबरदस्ती करतेस? एक काम कर ना, क्रोसिन दे त्याला, बघ लगेच बर वाटेल.’
२२.
बंड्या – अरे वा, गण्या, नवीन फोन? एकदम झकास वाटतोय. कितीला घेतला?
गण्या – फुकट...अरे हा माझा नाही माझ्या गर्लफ्रेंडचा फोन आहे.
बंड्या – पण तिचा फोन तू का घेऊन फिरतोयस?
गण्या – काही नाही रे, नेहमी कम्प्लेंट करायची तू माझा फोन उचलत नाहीस..... तू माझा फोन उचलत नाहीस. मग शेवटी आज आणलाच उचलून, आता बसू दे बोंबलत.
२३.
पिंकी (रात्री १२ वाजता) – आई मला झोपच येत नाहीये.
आई – किचनमध्ये जेवणाची भांडी पडली आहेत, आणि उद्या कामवाली येणार नाहीये.
पिंकी – अगं, मी झोपेत बडबडतेय.
२४.
गुरुजी (विज्ञानाच्या तासाला) – मक्या सांग बघू, पाण्यापेक्षा हलक्या कोणत्या वस्तू आहेत?
मक्या (डोकं लढवून) – भजी.
गुरुजी – भजी? कशी काय?
मक्या – कारण, तेल पाण्यावर तरंगत आणि भजी तेलात तरंगते.
२५.
एक बँक मॅनेजर हॉटेलमध्ये गेला आणि वेटरला मेनू विचारला
वेटर – वेज बिर्यानी, चिकन बिर्यानी, हैदराबाडी बिर्यानी, वेज पुलाव, तवा पुलाव........कढाई पनीर, पनीर टिक्का, वेज कोल्हापुरी..........साधी रोटी, बटर रोटी, नान, पराठा........
मॅनेजर – एक काम कर तीन बटर रोटी आणि एक पनीर टिक्का घेऊन ये.
वेटर – पण हे सर्व आयटम संपलेत आता.
मॅनेजर (रागावून) – मग हे आधी का नाही सांगितलस?
वेटर – कारण आता तुम्हाला कळेल आम्हाला कसं वाटत जेव्हा एटीएममध्ये गेल्यावर कार्ड टाका, पिन टाका, अमाउंट टाका, रिसीट हवी का नको ते टाका...एवढं सगळं केल्यानंतर समजत कॅशच नाहीये तेव्हा.
२६
मक्या – अरे यार पक्या, आज माझा काहीच आभ्यास झाला नाहीये, मी पेपरमध्ये काय लिहू?
पक्या – टेंशन नको घेऊस, पुढच्या मुलाची पाच उत्तर बघ, मागच्याला पाच उत्तर विचार, आणि शेजारच्या मुलांना पाच-पाच विचार, आरामात पास होशील.....पण पेपरवर सर्वात वरती एक टीप लिहायला विसरू नकोस.
मक्या – कोणती टीप?
पक्या – की, या पेपरमधील सर्व उत्तर काल्पनिक आहेत आणि वर्गातील इतर मुलांच्या उत्तराशी त्यांचा काहीही संबंध नाही. आणि जर काही संबंध आढळला तर त्याला निव्वळ योगायोग समजावा.
२७.
नवरा – आज भाजीत मीठ थोडं जास्त झालंय.
बायको – मीठ जास्त नाही झालंय तुम्ही भाजीच कमी आणली, जास्त भाजी आणायला काय होतं?
(बोलती बंद)
नवरा – हे कसले पराठे आहेत यात बटाटे तर दिसतंच नाहीयेत?
बायको – गुलाबजाम मध्ये गुलाब दिसतात का तुम्हाला? खा गपचूप.
(बोलती बंद)
नवरा – काय हे गेले चार दिवस भोपळ्याचीच भजी खातोय, आता एक महिनाभर भोपळा आणू नकोस.
बायको – दररोज तंबाखू खातो तेव्हा नाही कंटाळा येत? तो पण सोडा महिनाभर
(बोलती बंद)
२८.
रात्री एक वाजता गण्याच्या मोबाईलवर व्हॉट्स अप मेसेज आला –
-
ए शोन्या, काय करतोयस?
-
तुझा शोन्या झोपला आहे.
-
चल लबाडा, झोपला आहेस तर चॅटिंग कसा करतोयस?
-
तो झोपलाच आहे, मी, त्याची आई चॅट करतेय. सुनबाई, झोपा आता तुम्ही आणि त्याला पण झोपू द्या, उद्या गणिताचा पेपर आहे त्याचा.
२९.
परीक्षा हॉलमध्ये –
मक्या (दबक्या आवाजात) – मंग्या....मंग्या....पहिल्या प्रश्नाच उत्तर दाखव ना.
मंग्या – नाही लिहिलं.
मक्या – मग तिसऱ्या प्रश्नाचं?
मंग्या – ते पण नाही येत.
मक्या – चौथा, पाचवा , सहावा?
मंग्या – नाही येत मला.
मक्या (दातओठ खात) – तुला ७० च्या वर टक्के पडू देत मग बघतोच तुला.
३०.
एकदा एक दारुडा रात्री उशिरा घरी पोहचला. त्याला माहित होतं की बायको दरवाजा उघडणार नाही म्हणून त्याने दरवाज्याची कडी वाजवली आणि बोलला –
- डार्लिंग, बघ मी काय आणलंय, माझ्या सुंदरश्या बायकोसाठी सुंदर गिफ्ट आणलंय.
दरवाजा उघडत बायको विचारते –
- कुठे आहे? कुठे आहे सुंदर गिफ्ट?
दारुडा (आत सटकत)– सुंदर बायको कुठे तरी आहे?
३१.
एक शहरातला नवरा गावच्या अडाणी बायकोला पहिल्यांदा हॉटेलमध्ये घेऊन गेला.
नवरा – बोल, काय खाणार तू?
बायको – जे पण तुम्ही खाणार तेच मी पण खाईन.
नवरा – वेटर, जरा मेनू घेऊन येतो का?
बायको (भोळेपणाने) – मी पण मेनूच खाईन.
३२.
गावच्या सरकारी शाळेतली मुले एकाला धरून खेचत-खेचत शाळेत नेत असतात.
– चल, शाळेत चल, किती दिवस झाले शाळेला दांडी मारून?
एक म्हातारा त्यांना अडवतो
- अरे मुलांनो , त्याला नसेल यायचं तर नका जबरदस्ती करू, त्याला शिकायचं असेल तर शिकेल नाहीतर जाऊ देत.
- ओ आजोबा, ह्याला शाळेत शिकायला नाही शिकवायला नेतो आहोत आम्ही. आमचा मास्तर हाय तो. दोन आठवडे दांडी मारून घरी बसलाय.
३३.
नवरा-बायको मध्ये भांडण झालं आणि नवऱ्याने बायकोशी बोलण बंद केलं. चार दिवसानंतर बायकोला राहवलं नाही आणि तिने त्याला मानवायचा खूप प्रयत्न केला पण नवरा बोलेनाच, मग बायकोने पण तंबी दिली –
‘जर मी दहा म्हणायच्या आत तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत तर मी बाल्कनीतून उडी मारेन.’
तिने सुरवात केली, ‘एक....दोन......तीन....’ नवरा गप्प
‘सात.......आठ.........’ तरीही नवरा गप्पच
‘नऊ......................’ आता बायको गप्प,
थोड्यावेळाने न राहवून नवरा बोलला, ‘अगं पुढे मोज ना, दहा....दहा बोल....’
बायको- ‘हुश्श, थँक गॉड, तू बोललास माझ्याशी.....नाहीतर मी दहा बोलणारच होती.’
३४.
जोशी काका रेल्वेच तिकीट काढायला उभे असतात, तिकीट देणारा माणूस २०-२५ मिनिटे फोन कानाला लावून बसलेला असतो, काहीच बोलत नसतो.
जोशीकाका – ओ साहेब, फोन लागतं नाहीये तर माझं तिकीट देऊन टाका ना.
तिकीट देणारा (वैतागून) – थांबा जरा, माझी बायको बोलतेय फोनवर. तिचं बोलून झालं की देतो.
३५.
काका – मक्या तू शाळेत का नाही जात?
मक्या - मला शाळेत घेत नाहीत. हाकलून देतात.
काका – काय? तू काही मस्ती वगैरे करतोस का?
मक्या – नाही काका.
काका – मग का नाही घेत?
मक्या – ते म्हणतात की ही मुलींची शाळा आहे इथे तुला घेऊ नाही शकत.
३६.
नवीनच लग्न झालेली नवरी सकाळी आठ वाजले तरी झोपलेली असते. सासूबाई येतात आणि तिच्या अंगावर पाणी टाकतात. सून दचकून उठते आणि विचारते – सासूबाई, पाणी का टाकलत?
सासूबाई – तुझे पप्पांनी सांगितलं की मी माझ्या मुलीला फुलाप्रमाणे जपलंय तुम्ही पण तसचं जपा, म्हणून तू बावायला नकोस पाणी टाकलं...
३७.
एकाच ग्रुपमध्यला दहा मुलांनी कॉलेजमधल्या सर्वात सुंदर मुलीला प्रपोज करायचे ठरवले. आठ जण गुलाबाचं फुल घेऊन आले फक्त एकच मुलगा रिंग घेऊन आला
-
याला म्हणतात कॉनफिडंस
आणि दहावा तर वरातच घेऊन आला.
-
याला म्हणतात ओव्हर कॉनफिडंस
३८.
मुलगा – आय लव्ह यु.
मुलगी – माझ्याकडे आधीच बॉयफ्रेंड आहे.
मुलगा – ओएलएक्स वर विकून टाक, पुराना जायेगा तभी तो नया आयेगा.
३९.
नवीनच शिकवायला आलेले गुरुजी आल्या-आल्या प्रश्न विचारतात.
गुरुजी – भारतातल्या एखाद्या महान वैद्यानिकच नाव सांगा.
एक विद्यार्थी – आलिया भट
गुरुजी (चमकून) – काय बोललास?
विद्यार्थी – आलिया भट
सर रागाने त्याला चोप देऊ लागतात. पाच-सहा फटके खाल्यावर दुसरा विद्यार्थी बोलतो –
‘सोडून द्या ना सर त्याला, तो बोबडा आहे. त्याला आर्यभट्ट बोलायचं असेल’
४०.
शहरातला नवरा पहिल्यांदाच गावच्या बायकोला शहरात राहायला घेऊन आला.
बायको – हे काय? मी नाही इथे राहणार. मला आत्ताच्या आत्ता गावी सोडा.
नवरा – अगं पण......
बायको – एवढी छोटी खोली, इथे तर माझं सामान पण राहणार नाही, मग आपण कुठे राहणार?
नवरा – ऐक तरी.....
बायको – आणि संडास, बाथरूम तर जाऊ देत इथे तर साधी खिडकी सुद्धा नाहीये. मी नाही राहणार इथे.
नवरा – ए बावळट, ही लिफ्ट आहे लिफ्ट. आपलं घर सातव्या मजल्यावर आहे.